आदिनाथ महाराजांना लोककला जीवन गौरव पुरस्कार नागराज मंजुळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
आदिनाथ महाराजांना लोककला जीवन गौरव पुरस्कार
नागराज मंजुळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी – अमोल बोरगे
सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात “सन्मान लोककलेचा आणि अभिमान मायमराठीचा” या घोषवाक्याखाली शाहिरी लोककला संमेलन दिमाखात पार पडले. या संमेलनात सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते लोककला जीवन गौरव पुरस्कार २०२५ आदिनाथ महाराज (आळंदी) यांना प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराचे स्वरूप चांदीचं कडं आणि मानपत्र असे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांनी लोककलावंतांचा सोन्या-चांदीच्या कड्यांनी सन्मान केल्याच्या परंपरेवरून या पुरस्काराचे स्वरूप ठरवण्यात आल्याचे समितीने स्पष्ट केले. पुढे दरवर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे.
आदिनाथ महाराज यांनी हजारो लोकगीतांची निर्मिती केली असून, समाजप्रबोधनात्मक गीतांमुळे ते लोकमानसात घर करून आहेत. “माझ्या बाळाला शाळेत पाठवा…” सारखी गाणी गाडगेबाबांच्या प्रभावाची साक्ष देतात. पुण्यात सारसबाग येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात तसेच त्यांच्या जयंती उत्सव साजरे करण्यासाठी आदिनाथ महाराजांचा मोलाचा वाटा आहे. महागायक चंदन कांबळे यांसारख्या कलाकारांना घडवण्यातही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
वारकरी संप्रदाय आणि नाथपंथी संप्रदाय या दोन्हीचा ठसा त्यांच्या आयुष्यावर उमटलेला आहे. लोककलावंत समन्वय समिती (महाराष्ट्र राज्य) मार्फत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, लोककलावंतांनाही जीवनगौरव मिळावा हा समितीचा उद्देश आहे.
या सोहळ्यात नागराज मंजुळे यांनी विशेष उपस्थिती लावून आदिनाथ महाराजांचा सन्मान केला. समितीने म्हटले की, “नागराज अण्णा यांनी वेळ काढून लोककलावंतांचा सन्मान केला, त्याबद्दल आम्ही कायम ऋणी राहू.”
