ब्राह्मण समाजास महामंडळ आवश्यकः पालकमंत्री
समस्त ब्राह्मण समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी मंगळवार, 22 जानेवारी रोजी मुंबई आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनास आता सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पाठिंबा दिला आहे. समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी समाजाला महामंडळ देणे आवश्यक आहे, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
ब्राह्मण समाज समन्वयक प्रा काकासाहेब ऊर्फ मनोज कुलकर्णी, उद्योगपती गिरीश काळे शहर समन्वयक विक्रम डोनसळे, महाराष्ट्र प्रभारी दिनेश कुलकर्णी, योगेंद्र पुजारी आदींनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना समाजाच्या मागण्यांचे निवदेन दिले. त्यावेळी पालकमंत्र्यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. ते म्हणाले की, ब्राह्मण समाज राज्यात 7 ते 8 टक्के आहे. त्यांना आतापर्यंत कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. पूर्वी ब्राह्मण समाजाचा वैद्यकीय व्यावसाय होता, आता तोही त्यांचा राहिलेला नाही. त्यामुळे समाज अडचणीत आला आहे. त्यांच्या मुलांना उद्योगधंद्यांसाठी मदत व्हावी म्हणून ब्राह्मण समाजास महामंडळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी आंदोलनास पाठिंबा दिल्याबद्दल प्रा काकासाहेब उर्फ मनोज कुलकर्णी यांनी त्यांचे आभार मानले.
समाजातील आर्थिक मागास घटकातील तरूणांना शैक्षणिक व व्यावसायिक तसेच रूग्णांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, 500 कोटींची तरतूद करावी, समाजाला आरक्षण द्यावे, पुरोहितांना मानधन देवून विविध मंदिरात त्यांची नियुक्ती करावी, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह स्थापन करावे, सावकरांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, यासह विविध ागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे.
