जेवण वाढण्याच्या किरकोळ कारणातून उक्कडगाव येथील तरुणाचा सासरवाडी च्या लोकांकडून बेदम मारहाणीत मृत्यू
जेवण वाढण्याच्या किरकोळ कारणातून उक्कडगाव येथील तरुणाचा सासरवाडी च्या लोकांकडून बेदम मारहाणीत मृत्यू
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
जेवण वाढण्याच्या किरकोळ कारणातून उक्कडगाव ता.श्रीगोंदा येथील ३६ वर्षाच्या तरुणाला पत्नी, सासू, मानलेला मामा आणि इतर तीन जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेला तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि. 2 जानेवारी रोजी १० वाजण्याच्या दरम्यान घडली.
प्रभाकर अरुण तुपेरे (वय ३६ वर्ष) रा.उक्कडगाव, ता. श्रीगोंदा असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहेत.
या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ कुंडलिक तूपेरे याच्या फिर्यादीवरून सहा जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांनी तत्काळ हालचाल करत अवघ्या एक तासात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना अटक केली.
या प्रकरणी रेश्मा तुपेरे (पत्नी) , छाया जानराव (सासू), देविदास आडबल्ले (मानलेला मामा), नंदा आडबल्ले, रेखा बाळू साळवे, साधना संतोष गायकवाड यांना अटक करत न्यायालयात हजर केले.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उक्कडगाव ता.श्रीगोंदा येथील प्रभाकर अरुण तुपेरे याचे त्याची पत्नी रेशमा यांच्यात वारंवार किरकोळ भांडणे होत होती ती भांडणे प्रभाकर चे आई-वडील यांनी मिटवली होती.
दि. २७ डिसेंबर २०२४ रोजी रेशमाचा मानलेला मामा देविदास आडबल्ले रा. उक्कडगाव याचे घरी देवीच्या सुवासिनीच्या कार्यक्रम होता याकरिता प्रभाकरची सासू पुणे येथून देविदास आडबल्ले यांच्या घरी आली होती.
28 डिसेंबर रोजी रात्री प्रभाकर व त्याची पत्नी रेशमा यांच्यात जेवण वाढण्याच्या कारणावरून भांडण झाले. हे भांडण चालू असताना प्रभाकरची सासू छाया जानराव हिने देविदास आडबल्ले यास बोलवून घेतले. त्यावेळी देविदासची पत्नी नंदा, मुलगी रेखा बाळू साळवे, साधना संतोष गायकवाड ह्या देखील प्रभाकर च्या घरी आल्या. रेश्माला बोलत असल्याचे पाहून वरील लोकांनी प्रभाकर यास पाठीवर पोटावर लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली.
प्रभाकर हा त्याचा भाऊ कुंडलिक याच्या घरी गेला व दुसऱ्या दिवशी प्रभाकर याने सिदनकर हॉस्पिटल बेलवंडी या ठिकाणी औषध उपचार घेत दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी पोलीस स्टेशनला येऊन पत्नी, सासू, पत्नीचा मानलेला मामा, त्याची पत्नी आणि दोन मुलींच्या विरोधात तक्रार दिली.
दि.२ जानेवारी रोजी प्रभाकर याचे पोट दुखत असल्याने त्याचा दुसरा भाऊ विनोद तुपेरे याने प्रभाकर याला वरद हॉस्पिटल या ठिकाणी औषध उपचारा कामी नेले. तेथील डॉक्टरांनी प्रभाकर यास तपासून त्याच्या पोटातील आतड्यांना जबर दुखापत झाली असल्याची सांगितली याकरिता येणारा खर्च परवडण्यासारखा नसल्याने भाऊ विनोद अरुण तुपेरे यांनी प्रभाकर यास ससून हॉस्पिटल पुणे या ठिकाणी उपचारासाठी ऍडमिट केले. प्रभाकर याच्यावर उपचार चालू असताना दि. 2 जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्रभाकर याचे उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती बेलवंडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी मयताचा भाऊ कुंडलिक तूपेरे याच्या फिर्यादीवरून पत्नी रेश्मा तुपेरे, सासू छाया जानराव, मानलेला मामा देविदास आडबल्ले, देविदासची पत्नी नंदा आडबल्ले, मुलगी रेखा बाळू साळवे, साधना संतोष गायकवाड यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपी हे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस निरीक्षक संतोष भंडारे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना तत्काळ अटक केली.
