बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत वाळु तस्करावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल
बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत वाळु तस्करावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
रविवार दि.२२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर परिसरात झालेल्या वादात तीन ते चार जणांनी एका वाळुमाफियावर धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर संबधित व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी शिरुर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. याप्रकरणात सोमवार (दि.२३) रोजी रात्री उशिरा बेलवंडी पोलिस स्टेशनमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेलवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील फिर्यादी संदीप गुलाब खेडकर (वय ३२) रा. म्हसे, ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर हे (दि.२२) रोजी सायंकाळी १७:३० च्या सुमारास म्हसे ते पिंप्री कोलंदर रस्त्यावर दुचाकीवरुन जात असताना आरोपी यांनी त्याची चारचाकी गाडी व बुलेट फिर्यादीच्या दुचाकीला आडवी लाऊन बेकायदेशीर जमाव जमवत फिर्यादीस पिस्टलचा धाक दाखवुन कोयत्याने वार करुन दुखापत केली व फिर्यादीच्या खिशातील ३० हजार रुपये रोख रक्कम काढुन घेतली.
त्यामुळे संदीप खेडकर याच्या फिर्यादीनुसार बेलवंडी पोलिस स्टेशन येथे गणेश रामभाऊ दिवेकर, दादा मोहरे, विशाल लक्ष्मण देवीकर, अवी जर्जोळ, विजय भाऊसो देवीकर तसेच एक अनोळखी इसम सर्व (रा. म्हसे, ता. श्रीगोंदा, जि अहिल्यानगर) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पुढील अधिक तपास बेलवंडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मारुती कोळपे हे करत आहेत.
फिर्यादी हा या परिसरातील नामांकित वाळूतस्कर असून त्याची म्हसे गाव व नदीपट्टा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दहशत असून अनेक तरुण मुलांना आर्थिक व गाड्यांचे प्रलोभन देऊन महसूल विभाग व पोलिसांपासून संरक्षणासाठी लोकेशन माहिती साठी उपयोग करून घेत असल्याची व वाळू तस्करीच्या माध्यमातून आलेल्या पैशाचा गावात व नदीपट्टयामध्ये दबदबा निर्माण करत आहे असे स्थानिक नागरिकांमधून दबक्या आवाजामध्ये चर्चा होत आहे .
