स्पर्धा म्हणजे स्वतःला सिद्ध करणे – प्राचार्य के. सी. मोहिते
स्पर्धा म्हणजे स्वतःला सिद्ध करणे – प्राचार्य के. सी. मोहिते
शिरूर प्रतिनिधी –
स्पर्धा म्हणजे स्वतःला सिद्ध करणे होय आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत करून ज्ञान संपादन करत राहिले पाहिजे असे मत चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी मांडले.
शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी ‘ रसिकलालजी एम.धारिवाल सामान्य ज्ञान परीक्षा ‘ मोठ्या उत्साहात पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी व त्यांच्यात स्पर्धा परीक्षेसाठीच्या क्षमता विकसित व्हाव्यात या उद्देशाने ही स्पर्धा गेल्या २६ वर्षांपासून आयोजित केली जाते. स्पर्धेचे हे २७ वे वर्ष होते. या स्पर्धेमध्ये लहान गटात १३५६ मोठ्या गटात १३४८ व कनिष्ठ महाविद्यालय गटात ६४२ अशा एकूण ३३४६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या परीक्षेच्या औचित्याने महाविद्यालयातर्फे अनेक उपक्रमदेखील राबविण्यात आले. शाळा-महाविद्यालय समिती व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० – स्कुल कनेक्ट २.० संपर्क अभियान’ महाविद्यालयात राबविण्यात आले. महाविद्यालयाचा ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्यावतीने वाचन पंधरवडा दिनानिमित्ताने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रमदेखील घेण्यात आला. अनेक महत्त्वपूर्ण पुस्तकांचे व ग्रंथांचे प्रदर्शन यानिमित्ताने महाविद्यालयाच्या प्रांगणात भरविण्यात आले. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्यांने ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळे’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे विविध प्रयोगदेखील या दिवशी दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी घेऊन आलेल्या पालकांनादेखील प्रबोधनपर व्याख्यान यानिमित्ताने दाखवण्यात आले.
शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. अनिलजी बोरा, महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. प्रकाशशेठजी धारिवाल , संस्थेचे सचिव मा. श्री. नंदकुमारजी निकम, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, उपप्राचार्य एच. एस. जाधव यांनी या उपक्रमासाठी मार्गदर्शन केले. *महाविद्यालय नियामक मंडळाचे सदस्य मा.धरमचंदजी फुलपगर यांनी याप्रसंगी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले .* प्रा. सुनील कवादे व डॉ. विकास नायकवडी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
