३१ वर्षानंतर स्नेह मेळाव्यात बालमित्रांची झाली भेट १९९४ बॅचचे न्यु इंग्लिश स्कुलचे माजी विद्यार्थी
३१ वर्षानंतर स्नेह मेळाव्यात बालमित्रांची झाली भेट
१९९४ बॅचचे न्यु इंग्लिश स्कुलचे माजी विद्यार्थी
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, मढेवडगाव येथील शाळेच्या १९९४ मधील दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
“एक दिवस बालपणीचा ” या शीर्षकाखाली तब्बल ३१ वर्षानंतर विद्यार्थी एकमेकांना भेटल्यानंतर आपल्या बाल सवंगड्यांना कडकडून मिठी मारताना दिसले . तसेच बऱ्याच वर्षानंतर शिक्षकांचे दर्शन झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी गुरुजनांचे आशीर्वाद घेतले . यावेळी सर्वजण आपुलकीने एकमेकांची चौकशी करत आठवणींना उजाळा देत होते .
शाळेत शिकत असताना एकमेकांमध्ये स्नेहभाव निर्माण होतो पण शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मात्र प्रत्येकाच्या जीवन प्रवासाच्या वाटा वेगवेगळ्या होतात यामुळे मित्र दुरावले जातात .अशा बालमित्रांना पुन्हा एकदा एकत्र आणण्याचे काम स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून झाले . विद्यार्थी दशेत भेटलेले मित्र आता तब्बल ३१ वर्षांनी एकत्र आले तेव्हा बरेच जण एकमेकांना ओळखूही शकले नाहीत पण गप्पांच्या ओघात हळूहळू जुने दिवस प्रत्येकाला आठवले आणि स्नेह मेळाव्यात रंगत भरत गेली . खुप वर्षांनी वर्गातल्या बाकावर बसत जुन्या आठवणींना सर्वांनी उजाळा दिला .
याची सुरुवात शाळेची घंटा वाजवून झाली . सर्वप्रथम राष्ट्रगीत झाले. फुलांचा वर्षाव करीत गुरुजनांचे स्वागत करण्यात आले. वर्गात हजेरी झाल्यानंतर दिवंगत गुरुजन व विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सुरुवातीला आशिष दिवटे यांनी प्रास्ताविक करत असताना स्नेहमेळाव्याची पार्श्वभूमी,उद्देश व दिवसभराच्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी आपापली ओळख करून देत असताना मनोगत व्यक्त केले. सुरत,बंगलोर, रायगड,मुंबई,पुणे आदी ठिकाणांहून तसेच रेल्वे, सी.आय.एस.एफ, औद्योगिक, कृषी, शिक्षण, बँक ,शेती, राजकारण,समाजसेवा आदी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या एकूण १०१ विद्यार्थ्यांपैकी ८२ बालमित्र उपस्थित होते. विशेषतः मुलींची उपस्थिती लक्षणीय होती.बऱ्याच वर्षानंतर माहेरी आल्याचा आनंद व बाल मैत्रिणीची भेट घेण्याची ओढ स्पष्ट जाणवत होती .
मुलांच्या वतीने मुलींसाठी माहेरची साडी आठवण म्हणून भेट देण्यात आली.आणि मुलींनी पण प्रत्येक मुलांसाठी भेटवस्तु दिल्या.यावेळी या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या एकमेव शिक्षिका शुमांतिका शिंदे यांनी तसेच शिक्षक बाळासाहेब शिंदे ,बाबाजी शिर्के , सुभाष खराडे, दगडू गावडे ,सूर्यवंशी सर , मेहेत्रे सर तसेच भाऊसाहेब शिर्के सर् यांनी उपस्थित राहून तसेच रामचंद्र रायकर सर् यांनी आजारी असूनही भ्रमणध्वनी द्वारे मार्गदर्शन केले .
जेवणाच्या सुट्टीमध्ये स्नेहभोजनाचा आस्वाद घेताना मिठाई सोबत काही विद्यार्थ्यांनी बोरे, पेरू अशी रानमेवा शिदोरी सोबत आणली होती.पुन्हा वर्ग भरविण्यात आल्यानंतर गप्पा गोष्टी, चारोळी, कविता, गायन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती.संध्याकाळी शाळा सुटताना सर्वांनी कबड्डी , खो खो , क्रिकेट, संगीत खुर्ची खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला .
या स्नेह मेळाव्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तसेच फोनद्वारे संपर्क साधून सर्व बाल मित्रांना एकत्र आणण्यासाठी राजेंद्र काकडे , रंजना शिंदे – खांडेकर , आशिष दिवटे, गोविंद मांडे, शाम वाबळे, सविता साळवे , भारती पवार,प्रवीण वाबळे,भाऊसाहेब शिंगटे, सुभाष डांगे,सतीश मांडे यांनी विशेष परिश्रम घेतले. मॉनिटर दादा दरेकर, संदीप वाबळे यांनी खेळाचे नियोजन केले. सूत्रसंचालन राजेंद्र काकडे व सविता गायकवाड यांनी केले तर आभार आप्पासाहेब मांडे यांनी मानले .
