ताज्या घडामोडी

पारनेर तालुक्यातील उपसा सिंचन योजनेचा सर्वे करण्यास तातडीने निधी द्या, भूमिपुत्रांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी

पारनेर तालुक्यातील उपसा सिंचन योजनेचा सर्वे करण्यास तातडीने निधी द्या, भूमिपुत्रांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी

पारनेर प्रतिनिधी – प्रतीक शेळके –

तालुक्यातील दुष्काळी गावांना शेतीसाठी कुकडी प्रकल्पातून हक्काचे पाणी मिळावे ही गेली ४० वर्षापासून ची मागणी आहे. या प्रलंबित प्रश्नावर 13 जानेवारी रोजी कान्हूर पठार या ठिकाणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित पाणी परिषद झाली होती. त्या परिषदेत नामदार विखे पाटील यांनी दोन महिन्यांत सर्वेसाठी निधी उपलब्ध करून सर्वे करू अशी घोषणा केली होती. मात्र दोन महिने उलटून गेले तरी कोणत्याही प्रकारे हालचाल झालेली दिसत नसल्याने तसेच पिंपळगाव खांड धरणाचे पाणी शिंदोडीपर्यंत मिळावे यासाठी आवर्तन सुरू असताना मुळा नदीकाठच्या जवळपास २०० शेतकऱ्यांनी पारनेरचे आमदार काशिनाथ दाते सर व संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थित जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती. शिंदोडीपर्यंत पाणी देऊ असे आश्वासन त्या वेळी देण्यात आले होते. पण शिंदोडीपर्यंत पाणी मिळाले नाही अशा या प्रमुख दोन प्रश्नांवर भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे जाऊन
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी ना. विखे पाटील यांच्याशी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली.

या चर्चेत पारनेर तालुक्यातील उपसा सिंचन योजनांचा सर्वे करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात यावा, पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रात जांबुत, टेकडवाडी, साकुर, मांडवे या बंधाऱ्यांचा समावेश करण्यात यावा या मागण्या प्रामुख्याने बैठकीत लावून धरण्यात आल्या, मात्र या बैठकीत कुठल्याही प्रकारे ठोस निर्णय झाला नाही. फक्त हे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन जलसंपदा मंत्री ना. विखे यांनी दिले.

यावेळी अशोक आंधळे, बाळशिराम पायमोडे, संतोष वाबळे, मनोज तामखडे, अन्सार पटेल, बाळासाहेब वाळुंज, सुभाष डोंगरे, अनिल सोबले, शरद बालवे,वसंत साठे, बापू (गट मेजर ), शंकर पठारे, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!