मीडिया मॉनिटरिंग खासगी संस्थेकडे देण्याच्या सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध.. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वतीने तिव्र आंदोलन करणार – जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे
मीडिया मॉनिटरिंग खासगी संस्थेकडे देण्याच्या सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध..
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वतीने तिव्र आंदोलन करणार – जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
राज्य सरकारने वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमांवरील बातम्यांचे संकलन व विश्लेषण करण्याचे काम खासगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतल्याने तसेच हा निर्णय पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांना आणि लोकशाही मूल्यांना बाधा आणणारा असून, माध्यम स्वातंत्र्यावर गंभीर आघात करणारा असल्याचे मत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांनी अहिल्यानगर येथे बोलताना व्यक्त केले.
आज दि.१२ मार्च रोजी सकाळी १२ वाजता पारनेर तहसील कार्यालयावर आणि दूपारी २ वाजता अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयामधे पत्रकारांसह जात त्यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले.
पत्रकारितेचा मुख्य हेतू जनतेपर्यंत सत्य व वस्तुनिष्ठ माहिती पोहोचवणे हा आहे. मात्र, सरकारकडून या कामासाठी खासगी संस्था नेमण्याचा निर्णय घेतल्यामुळे बातम्यांवर अप्रत्यक्ष सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका आहे. हा निर्णय सरकारविरोधी मतप्रवाह दडपण्याचा आणि प्रसारमाध्यमांवर आपला अंकुश ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.देशाच्या लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आणि पत्रकारितेच्या स्वतंत्र भूमिकेचे संरक्षण करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई,अहिल्यानगर जिल्ह्याचे वतीने सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध करत असल्याचे सांगीतले.सदर निवेदनामधे, सरकारने पारदर्शकता न ठेवता खासगी संस्थेला हे काम सोपवणे म्हणजे माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न आहे. सरकार कडून लादली गेलेली ही अघोषित आणीबाणी त्वरित मागे घेण्यासंदर्भात आम्ही शासनास पत्राद्वारे कळवले होते. मात्र, आमच्या मागण्यांची दखल न घेतल्याने आज १२ मार्च रोजी महाराष्ट्राचे संवेदशील आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई तर्फे राज्यव्यापी लेखणीबंद आंदोलन व निदर्शने करण्याचे ठरवले असून आपणास या निवेदनाद्वारे पुन्हा एकदा आमच्या मागण्या सरकार दरबारी ठेवण्यास अवगत करत आहोत.पुढील ८ दिवसांत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही मंत्रालयाबाहेर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलने करु असा इशारा देत आहोत. सदर बाब पुरोगामी महाराष्ट्रात घडू नये असे आम्हाला वाटते यासाठी आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करुन राज्य शासनाने खाजगी संस्थेमार्फत मीडिया मॉनिटरिंग करण्याचा घेतलेला निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी विनंती आहे अशा आशयाचे निवेदन देण्यात राज्यभरातील जिल्हाधिकारी,तहसिल कचेरीवर तसेच सरकारी कार्यालयांमधे देण्यात आले आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अहील्यानगर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे,उपाध्यक्ष विनोद गायकवाड,तालुका सचिव संतोष कोरडे,सह सचिव अॅड्.सोमनाथ गोपाळे,उपाध्यक्ष वसंत रांधवण,उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे,तालुका खजिनदार नितीन परंडवाल,इलेक्ट्राॅनिक्स मिडीया प्रमुख महेश शिंगोटे आदींसह पत्रकार बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.
