ताज्या घडामोडी

सुप्यात सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक, शुक्रवारी एजंटला घेरावा, एजंटसह कंपनीविरोधात गुन्हा दाखल करणार

सुप्यात सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक, शुक्रवारी एजंटला घेरावा, एजंटसह कंपनीविरोधात गुन्हा दाखल करणार

पारनेर / प्रतिनिधी : सुदाम दरेकर  :-

भरमसाठ परतावा देण्याच्या अमिषाला बळी पडल्याने सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपये ‘सिस्पे कंपनीत’ आता बुडाल्यात जमा आहेत. कारण सुपा येथील ‘सिस्पे कंपनी’ ने गाशा गुंडाळला असून सुमारे चार महिन्यापासून फक्त लवकरच तुमचे पैसे मिळतील काळजी करू नका. अशा भूलथापा दिल्या जात असून याविरोधात ठेवीदार आक्रमक झाले असून शुक्रवार दि.१८ जुलै रोजी संबंधित एजंटला जाब विचारणार आहे. यानंतर सुपा पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती ठेवीदारांनी दिली. बुधवारी सर्व ठेवीदार एकत्र येऊन सुपा येथील इन्फोटेक बिकन या शाखेत गेले असता हि शाखाच १५ दिवसांपासून बंद असल्याचे ठेवीदारांना दिसले.
दरम्यान आम्ही आहोत अशी आश्वासने देण्याचे काम येथील कंपनीच्या एजंटांनी केले आहे. गुंतवणुकदार पैसे मागण्यासाठी चकरा मारत आहेत. मात्र, आता पंधरा दिवसांपासून कार्यालयच बंद झाल्याने अनेक जण याबाबत तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
पारनेर तालुक्यात यापुर्वी काही पतसंस्थांमध्ये घोटाळे झाल्याने त्या पतसंस्थांमध्ये अनेक गोरगरीब ठेवीदारांचे लाखो रूपये अडकले आहेत. त्यानंतरही पारनेर शहरात ‘श्रीमंत बाजार’ नावाने एक ऑनलाईन ट्रेडींग सुरू होते. त्यातही सुमारे १५ ते २० टक्के परतावा दिला जात होता. या मोठ्या परताव्याच्या अमिषाला बळी पडून त्यातही अनेक उच्चभ्रू व सुशिक्षितांनी कोट्यावधीची गुंतवणुक केली होती. मात्र त्याही कंपनीचे काही दिवसातच दिवाळे निघाले व त्यातही गुंतवणुकदारांचे लाखो रूपये अडकले ते परत मिळालेच नाहीत.
त्यानंतर सुपे येथीलच मनिमॅक्स नावाची कंपनी आली त्याही कंपनीने १२ ते १८ टक्के परताव्याचे अमिष दाखविले काही दिवस परतावाही दिला. मात्र, सुमारे सहा महिण्यांपुर्वी ही कंपनीसुद्धा गायब झाली याही कंपनीत सुपा व परीसरातील लाखो रूपये गुंतवणुकदारांचे बुडाले आहेत. यातील कंपनीच्या संचालकांवर गुन्हाही दाखल झाला आहे.
याला काही महीने होत नाहीत तोच आता सुपा व परीसरातील गुंतवणुकदारांचे प्रथम सिस्पे नंतर ‘झेस्ट’ या नावाची शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली व १० ते १२ टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून लाखो रूपये जमा केले व आता याही ठिकाणी गुंतवणुकदारांचे काही दिवसापासून पैसे परत मिळेनासे झाले आहेत. कंपनीचे काम सुरू आहे. कंपनीचे नाव बदलले आहे. परकीय चलनात आपले शेअर्स बदलले जात आहेत, सॉफ्टवेअर दुरूस्ती सुरू आहे, अशी कारणे सांगत गुंतवणुकदारांना काही दिवस झुलवत ठेवले होते. आता मात्र कंपनीचे कार्यालय गेली पंधरा दिवसांपासून बंद झाल्याने आता पैसे मिळणार नाहीत अशी खात्री गुंतवणुकदारांची झाली आहे. त्यामुळे काही गुंतवणुकदार एकत्र येऊन तक्रार देण्याच्या तयारीत आहेत.
सिस्पे मध्ये पैसे जमा करण्याचे प्रलोभन देणारे गावातीलच स्थानिक एजंट होते. त्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी विश्वास ठेवला. एजंटांनी आपले मित्र जवळचे नातेवाईक यांचेच पैसे गुंतवणुकीसाठी घेतले. त्यांना प्रथम काही दिवस चांगला परतावा ही दिला होता. आता मात्र पैसे मिळत नसल्याने सर्वजण हताश झाले आहेत. पैसे मित्राच्या किंवा नातेवाईकांच्यामार्फत गुंतवल्याने अनेकांची तक्रार करण्याची अडचण झाली आहे.
अनेकांनी कर्ज काढून तर काहींनी आपली सेवानिवृत्तीची पुंजी यात गुंतविल्याची चर्चा सुरू आहे. सुपा परीसरात नव्याने एमआयडीसी झाल्याने त्या ठिकाणी ज्यांच्या जमिनी गेल्या होत्या त्यांना जमिनीचे पैसे मिळाले होते. त्यांनी ते पैसे यात गुंतविले आहेत. त्यामुळे आता जमीनही गेली व पैसेही गेले अशी काहींची अवस्था झाली आहे.
याच कंपनीच्या नावांने पारनेरसह श्रीगोंदे, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक झाली आहे. व ती सुमारे तीन हजार तीनशे कोटी रूपये आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे. याविरोधात ठेवीदार आक्रमक झाले असून याचा उद्रेक बुधवारी शाखेसमोर पहावयास मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!