गुरुमुळेच आत्मज्ञानाची प्राप्ती : आद्य स्वामी शिवानंद दादाजी महाराज
गुरुमुळेच आत्मज्ञानाची प्राप्ती : आद्य स्वामी शिवानंद दादाजी महाराज
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर :-
धुळे ता. साक्री. पिंपळनेर शुक्रवार दि. 11 गुरुशिवाय खऱ्या सुखाची प्राप्ती होणे शक्य नाही. आत्मा व परमात्मा यांचा संवाद गुरुच घडवतो. असे प्रतिपादन पिंपळनेर येथील दादाजी दरबाराचे प्रमुख आद्य स्वामी शिवानंद दादाजी महाराज यांनी केले. येथील ओम दादाजी दरबारात गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. स्वामीजी म्हणाले की माणूस भौतिक मोहमायाच्या जाळ्यात अडकलेला असून त्यातून बाहेर येण्यासाठी संत, ऋषीमुनी आणि गुरुच्या शिकवणीचा अवलंब करणे आवश्यक आहे भक्ती चिंतन आणि साधनेमुळे मन व शरीर शुद्ध होऊन आत्मकल्याण शक्य होते. भगवंताने दिलेला अमूल्य देह आणि बुद्धीचा सदुपयोग करत जीवनात सत्कर्म करणे हे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट असावे या अध्यात्मिक सोहळ्यात आद्य स्वामी शिवानंद दादाजी महाराजांच्या शिष्यगणांनी त्यांच्या अध्यात्मिक प्रवासातील अनुभव व सूक्ष्म प्रवासाविषयी कथन केले. सायंकाळी आद्य स्वामी शिवानंद दादाजी महाराजांची सजवलेल्या रथातून ढोल ताशाच्या गजरात आणि डीजेच्या तालावर प्रमुख रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली तसेच या ठिकाणी महिलांनी औक्षण करून महाराजांचे दर्शन घेतले. या ठिकाणी आद्य धुनी द्वारिका मैया परमपूज्य माऊली माताजी उपस्थित होते. तसेच या ठिकाणी नवीन गुरुबंधू भगिनींचा अनुग्रहाचाही कार्यक्रम संपन्न झाला. हवन, भजन, सत्संग व सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्रीगोंदा तालुक्यातील गाणेगाव येथील शेकडोंच्या संख्येने गुरु बंधू भगिनी यांनी दादाजी नामाचा गजर करीत हातात निशान घेऊन मुक्काम करत करत दिंडी उपस्थित राहिली होती. तसेच या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. या ठिकाणी महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरील गुरुबंधू भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिले होते.नंतर या ठिकाणी आद्य स्वामी शिवानंद दादाजी यांचे अनमोल असे ज्ञानदान झाले.महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे नियोजन आयोजन धुनीवाले धनंजय सरकारजी यांनी केले..
