देवदैठण येथे लेखी आश्वासनानंतर उपोषण सुटले श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे सौर ऊर्जा प्रकल्पासंदर्भात असलेल्या विविध मागण्यांबाबतचे अमरण उपोषण मंगळवार दि. १० रोजी लेखी आश्वासनानंतर सुटले.
देवदैठण येथे लेखी आश्वासनानंतर उपोषण सुटले
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे सौर ऊर्जा प्रकल्पासंदर्भात असलेल्या विविध मागण्यांबाबतचे अमरण उपोषण मंगळवार दि. १० रोजी लेखी आश्वासनानंतर सुटले.
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे ( मुख्यसंपादक )
सौर ऊर्जा प्रकल्प सुरू होऊन पाच वर्षाहून अधिक काळ लोटला तरीही शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा मिळाला नाही. या प्रकल्पाच्या लाखो रुपयाच्या करापासून ग्रामपंचायत अद्यापही वंचित आहे. तसेच पाणी पुरवठा योजना, सर्व स्ट्रीट लाईट, सर्व शासकीय कार्यालयां साठी मोफत वीज मिळावी, शासकीय नियमानुसार प्रकल्पा पर्यंत रस्ता तयार करणे व त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षारोपण करणे या सर्व मागण्यांसाठी देवदैठण ( ता. श्रीगोंदा ) येथे सतिष वाघमारे, सर्जेराव कौठाळे, संतोष बनकर हे सोमवार दि. ९ डिसेंबर रोजी अमरण उपोषणास बसले. या काळात माजी आमदार राहूल जगताप, सभापती अतुल लोखंडे, विस्तार अधिकारी सारीका हराळ आदीनी उपोषण स्थळी भेट दिली. तर खासदार निलेश लंके यांनी उपोषणकर्ते सतिष वाघमारे यांच्याशी फोनवरून संपर्क करत विचारपूस केली.
मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी बेलवंडी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता महेंद्र सुर्यवंशी यांनी ३३ केव्ही हिंगणी उपकेंद्रा मधे लोड बाय फर्गेशन तसेच इतर प्रस्तावित कामे पुढील अडीच ते तीन महिन्यात पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तसेच २६ मार्च २०२५ पर्यंत शेती पंपाला दिवसा वीज पुरवठा करण्यात येईल असे लेखी आश्वासन देत वरील इतर सर्व मागण्यांचा पाठपूरावा करून त्या मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन देऊन सतिष वाघमारे यांना लिंबू पाणी पाजत उपोषण सोडले. यावेळी मंडल अधिकारी गिरीश गायकवाड, तलाठी संगीता मगर आदीसह तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे, माजी सरपंच शामराव गायकवाड, सुनिता वाघमारे, जयवंत गायकवाड, माजी उपसरपंच विजय कोकाटे, दिपक कौठाळे, डॉ. भाऊसाहेब जाधव, महेश वाघमारे, सतिष कौठाळे, बाळासाहेब वाघमारे, पवन अलभर, वैजनाथ वाघमारे, गोरख ढवळे, नामदेव वाघमारे, डॉ. संतोष भालेकर आदी उपस्थित होते.
५२ एकर जागेसंदर्भात ग्रामसभा ठराव झालेबाबत ग्रामपंचायत मधे कसलेही रेकॉर्ड उपलब्ध नाही
देवदैठण येथे पाच वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी मर्यादितचे मा. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर झाला आहे. मात्र माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार सौर ऊर्जा प्रकल्पास दिलेल्या ५२ एकर जागेसंदर्भात ग्रामसभा ठराव झालेबाबत ग्रामपंचायत मधे कसलेही रेकॉर्ड उपलब्ध नाही. ग्रामस्थांना विश्वासात न घेता सौर ऊर्जा प्रकल्पाला बोगस ठराव देण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याची संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.
सतिष वाघमारे – उपोषणकर्ते
